Sunday, December 15, 2013

आवड कलेची !!!

       महेश तू अचानक चित्र काढायला कसा लागलास असा प्रश्न सर्वच नातेवाईकानी आणि जुन्या मित्र मैत्रिणीनी विचारला. बऱ्याचदा जे मनात आहे ते नेमकं उत्तर देता आलं नाही.
       सर्व च कला शिकाव्या लागतात तेव्हाच त्या जमतात असं माझं स्वतःचं मत झालं होतं. त्यामुळेच बऱ्याच गोष्टी मध्ये आवड असून ती शिकत बसायला लागेल म्हणून ती करणंच टाळत गेलो. जेव्हा ती गोष्ट किंवा ती कला अवगत करायची असं विचार मनात यायचा तेव्हा दुसरं मन म्हणायचं कि "जाऊ दे रे तुला नाही जमणार...." आणि करिअरसाठी त्याचा काय उपयोग होणार?? असे विचार मनात येत राहिले आणि मी ती आवड मनात दाबून ठेवत गेलो.
        बरीच वर्ष शिक्षण आणि नोकरी हेच लक्ष्य डोळ्यापुढे ठेऊन मी कले कड दुर्लक्ष केलं. त्यातली आवड देखील संपलीच होती. आयुष्याला एक वेगळा वळण लागलं होतं.नोकरी साठी परदेशगमन सुद्धा झालं. पण याच परदेशगमनाने जरा मनाला एक वेगळा आराम आणि एक वेगळाच एकांत दिला.
याच संधीचा मी फायदा घेत माझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायची ठरवली. ती म्हणजे एखादी तरी कला अवगत करायची आणि मी तशी धडपड सुरु केली. सुरुवात एका स्केच बुक पासून झाली. मग एक गिटार सुद्धा रूम मध्ये आली तिच्या मागोमाग कीबोर्ड आला. पेंटिंग चे सर्व साहित्य आले. जमेल तसं जमेल ती कला मी अवगत करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि करतोय सुद्धा. माझ्यासाठी ती एक अपूर्ण राहिलेली इच्छा होती म्हणून ती पूर्ण करण्याची मी धडपड केली. पण एक शिकवण मिळाली आणि तीच सर्वाना सांगावीशी वाटते.
       शिकवण अशी मिळाली कि तेव्हा वेळ वाया घातला नसता तर आत्ता या सर्व कला अवगत असत्या. आणि  करिअर करायचं म्हणून नाही पण त्या मध्ये मिळणारा आनंद देखील खूप अनमोल आहे. कदाचित थोडं लवकर शिकलो असतो तर बरं झालं असतं असं सारखं च मन म्हणत असतं. थोडी उशिरा आली पण अक्कल आली !!!
       म्हणून आणखी एक मनात दाबून ठेवलेली इच्छा जरा करून पहावीशी वाटली ती म्हणजे लेखन कला अवगत करू पाहण्याची ........वेळ लागेल पण खात्री आहे कि या मधला पण आनंद लुटून पाहता येईल.
       हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला मला सांगावेसे वाटेल कि करिअर साठी म्हणून नाही पण त्यातला आनंद लुटता यावा म्हणून तरी एखादी कला अवगत करायचा प्रयत्न नक्की करा. कदाचित हा आनंद अनुभवल्यावर च त्यातली मजा कळेल.एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या कलेची आवड असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. निदान जे मला उशिरा समजलं ते त्यांना लवकर अनुभवता येईल.