Friday, April 18, 2014

आयुष्य

नाती, नात्यांमधील प्रेम आणि आर्थिक ध्येये या गोष्टींचा गुंता सोडवता सोडवता आयुष्य संपून जाते. आयुष्य म्हणजे काय हे समजण्याची मानसिक तयारी होईपर्यंत मृत्यू आपले हात पसरवून आपल्याला सामावून घेण्यासाठी उभा असतो. जीवनाची सुरुवात होते तेव्हा जीवन म्हणजे काय ते समजत च नाही. आणि जेव्हा अनुभवातून काही शिकू लागतो तेव्हा जीवन हेच आहे असं आपण स्वताला सांगत जातो. प्रत्येक जण एकमेकांना सांगत राहतो कि "हसत राहा" किंवा "काळजी घे." पण हे कुणीच नाही सांगत कि बाळ जीवनात हसायला मिळणार नाही, जीवनात काळजी घेणारे सुद्धा मिळणार नाही, तेव्हा स्वतः असे काही कर कि स्वताचे दुखं स्वतः विसरून हसण्यास समर्थ हो, संकटाना समोर जाण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतः समर्थ हो". कारण आयुष्य म्हणजे फक्त दुखाचा समुद्र असतो जेथे सुखाची लाट आपण शोधत फिरत असतो. एकमेकांना हसायला सांगणारे आपणच रडत असतो.

Saturday, March 29, 2014

Be Positive !!!


आयुष्यात अनेक अनुभव येतात जे वेगवेगळ्या शिकवण देऊन जातात. अगदी सरळ सांगायचं तर शाळेत शिकवून परीक्षा घेतली जाते पण जीवनात परीक्षा घेऊन शिकवणी दिल्या जातात. माझ्या देखील आत्तापर्यंतच्या जीवनात मला काही असे अनुभव आले ज्यांनी आधी परीक्षा घेतली आणि मग शिकवण दिली. त्यात मला एका गोष्टीची जाणीव झाली आणि ती लिहून ठेवावीशी वाटली जी कदाचित वाचणाऱ्याला मार्गदर्शक ठरू शकेल.

"Be Positive " हे तुम्ही आम्ही ऐकलेलं नेहमीचं वाक्य आहे. ज्या मध्ये सोप्पा बोध आहे कि काळजी करू नका आणि positive राहा, सर्व ठीक होईल. मी या गोष्टीला डोळ्यासमोर ठेऊन जीवनातल्या बऱ्याच परीक्षा द्यायचा प्रयत्न केला पण हळू हळू एक अनुभव यायला लागला आणि माझा मन मलाच सांगू लागलं कि " Don 't  be positive and be ready to face the worst ".

जेव्हापासून या "be ready to face the worst " चा मी वापर करू लागलो, आपोआप वाईटात वाईट काय होऊ शकतं या साठी मानसिक तयारी होऊ लागली आणि समोर येणारे आव्हान पेलण्यासाठी एक "positive attitude" तयार होत गेला. हा एक चांगला अनुभव मिळाला ज्याने एक कळले कि "आंधळेपणाने सर्व चांगलं होईल असं म्हणत राहण्यापेक्षा वाईटात वाईट काय होईल या साठी मानसिक तयारी करून त्याला सामोरं जाण्याची हिम्मत मिळू लागते."    

Tuesday, January 7, 2014

चित्रपट !!

         एखाद्या चित्रपटाचं एखादं वाक्य किंवा एखादा प्रसंग आपल्या डोक्यात काही दिवस तरी खूळ मांडून असतोच आणि त्या एखाद्या वाक्यात जर एखादा महत्व पूर्ण बोध असेल तर आपोआप तो आपल्याला विचार करायला भाग देखील पाडतो. कारण कळत नकळत च आपण त्या वाक्याला किंवा त्या चित्रपटामधल्या घडामोडींना कुठे तरी आपल्या आयुष्यासोबत जोडू लागतो आणि आपल्यातलं बालमन डोळ्या पुढे आपला चित्रपट देखील तयार करून आपल्याला दाखवतं.

        अगदी असाच एक माझा अनुभव मला सांगावासा वाटतो. मी कधी कुणाला सांगू शकलो नाही पण मनात नेहमी असतं कि तो अनुभव सांगावा पण तसा योग देखील येत नाही. पण या ब्लॉगद्वारे तो प्रयत्न मी केला.

         मी शाळेत असतना "लक्ष्य" हा ह्रितिक रोशन चा चित्रपट पाहिला होता. त्यातला एक प्रसंग खूप काही शिकवून गेला.तो प्रसंग म्हणजे जेव्हा ह्रितिकला प्रीती झिंटा चे वडील विचारतात कि पुढे काय बनायचं ठरवलंय आणि ह्रितिक त्या प्रश्नावर अनुत्तरीत होतो.त्यावर तिचे वडील त्याला जे सांगतात ते आपल्या सर्वांना च विशेष महत्वाचे आणि आयुष्यात लागू करावे असे काही सांगतात.

"तू जे काही करशील ते चांगलं आणि मनापासून कर. मग तू एखादा घास कापणारा जरी झालास तरी एक चांगला घास कापणारा हो. तू ज्या क्षेत्रामध्ये काम करशील ते फक्त चांगलं आणि मनापासून कर यश तुला आपोआप मिळेल".

         खरोखर या वाक्याने मला खूप दिवस वेडं केला होतं. मी पुढे काय बनणार हे तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतंच पण मग हे आपल्या आयुष्यात कसं लागू करता येईल या गोष्टी चा विचार मात्र नेहमी डोक्यात यायचा.

          वेळ लागला पण प्रयत्न चालू ठेवले होते मी. मग अगदी आमच्या किराणा मालाच्या दुकानात बिस्किटाचे पुडे मांडण्यापासून ते माझ्या अभ्यासाच्या वही ला कव्हर लावण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट करताना मी तो प्रयत्न केला कि जे काम करू ते चांगलं करू. हळू हळू त्यात आनंद मिळू लागला कारण त्या केलेल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होऊ लागलं. ती गोष्ट कोणतीही असो पण ती कुणाला न कुणाला नक्की आवडत असे. मग हा प्रयत्न मी प्रत्येक ठिकाणी चालू ठेवला. वह्या पुस्तके , सबमिशन्स आणि मग ऑफिस चे काम करताना मला याचा विशेष फायदा झाला.

         मी आज हि प्रत्येक ठिकाणी हा प्रयत्न करत आहे.कळत नकळत त्या गोष्टीचा मला आज खूप फायदा होतोय. मला एवढंच वाटतं कि हा प्रयत्न प्रामाणिक असावा त्याला यश आपोआप मिळेल.

         आणखी एक "थ्री इडियटस" मधून मिळालेला मेसेज मी सध्या माझ्या आयुष्यात लागू करून पाहतोय. " सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेल्लेंस के पीछे भागो. सक्सेस झक मारके पीछे आयेगा."  
सध्या तो एक्सेल्लेंस मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. सक्सेस बद्दल माहित नाही.

         तुम्ही देखील प्रयत्न करून पहा. थोडसं पोरकट बोलतोय पण हा माझा अनुभव मला सांगावासा वाटला.

चित्रपट म्हणजे मनोरंजन असा समज सध्या गाजतोय. पण त्यात हि एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर प्रोत्साहन देण्याची क्षमता असते हे मी अनुभवलं.

Sunday, December 15, 2013

आवड कलेची !!!

       महेश तू अचानक चित्र काढायला कसा लागलास असा प्रश्न सर्वच नातेवाईकानी आणि जुन्या मित्र मैत्रिणीनी विचारला. बऱ्याचदा जे मनात आहे ते नेमकं उत्तर देता आलं नाही.
       सर्व च कला शिकाव्या लागतात तेव्हाच त्या जमतात असं माझं स्वतःचं मत झालं होतं. त्यामुळेच बऱ्याच गोष्टी मध्ये आवड असून ती शिकत बसायला लागेल म्हणून ती करणंच टाळत गेलो. जेव्हा ती गोष्ट किंवा ती कला अवगत करायची असं विचार मनात यायचा तेव्हा दुसरं मन म्हणायचं कि "जाऊ दे रे तुला नाही जमणार...." आणि करिअरसाठी त्याचा काय उपयोग होणार?? असे विचार मनात येत राहिले आणि मी ती आवड मनात दाबून ठेवत गेलो.
        बरीच वर्ष शिक्षण आणि नोकरी हेच लक्ष्य डोळ्यापुढे ठेऊन मी कले कड दुर्लक्ष केलं. त्यातली आवड देखील संपलीच होती. आयुष्याला एक वेगळा वळण लागलं होतं.नोकरी साठी परदेशगमन सुद्धा झालं. पण याच परदेशगमनाने जरा मनाला एक वेगळा आराम आणि एक वेगळाच एकांत दिला.
याच संधीचा मी फायदा घेत माझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायची ठरवली. ती म्हणजे एखादी तरी कला अवगत करायची आणि मी तशी धडपड सुरु केली. सुरुवात एका स्केच बुक पासून झाली. मग एक गिटार सुद्धा रूम मध्ये आली तिच्या मागोमाग कीबोर्ड आला. पेंटिंग चे सर्व साहित्य आले. जमेल तसं जमेल ती कला मी अवगत करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि करतोय सुद्धा. माझ्यासाठी ती एक अपूर्ण राहिलेली इच्छा होती म्हणून ती पूर्ण करण्याची मी धडपड केली. पण एक शिकवण मिळाली आणि तीच सर्वाना सांगावीशी वाटते.
       शिकवण अशी मिळाली कि तेव्हा वेळ वाया घातला नसता तर आत्ता या सर्व कला अवगत असत्या. आणि  करिअर करायचं म्हणून नाही पण त्या मध्ये मिळणारा आनंद देखील खूप अनमोल आहे. कदाचित थोडं लवकर शिकलो असतो तर बरं झालं असतं असं सारखं च मन म्हणत असतं. थोडी उशिरा आली पण अक्कल आली !!!
       म्हणून आणखी एक मनात दाबून ठेवलेली इच्छा जरा करून पहावीशी वाटली ती म्हणजे लेखन कला अवगत करू पाहण्याची ........वेळ लागेल पण खात्री आहे कि या मधला पण आनंद लुटून पाहता येईल.
       हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाला मला सांगावेसे वाटेल कि करिअर साठी म्हणून नाही पण त्यातला आनंद लुटता यावा म्हणून तरी एखादी कला अवगत करायचा प्रयत्न नक्की करा. कदाचित हा आनंद अनुभवल्यावर च त्यातली मजा कळेल.एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या कलेची आवड असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचा आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. निदान जे मला उशिरा समजलं ते त्यांना लवकर अनुभवता येईल.